972 ला जर्मनीमध्ये झालेल्या पॅरालिंपिकमध्ये भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून देणारे मुरलीकांत पेटकर सांगत होते. पेटकर पुण्यातील थेरगाव भागात राहतात.

पेटकर यांनी पॅरालिंपिकमध्ये स्विमिंगमध्ये केवळ सुवर्णपदकच नाही तर एक विश्वविक्रम देखील प्रस्थापित केला होता. त्यांच्या या कामगिरीबद्दल भारत सरकारने त्यांना 2018 साली ‘पद्मश्री’ने सुद्धा सन्मानित केलं आहे.

मुरलीधर पेटकर मुळचे सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरचे रहिवासी. लहानपणी त्यांना कुस्तीचे वेड होतं. एका स्पर्धेत त्यांनी त्यांच्या गावच्या सरपंचाच्या मुलाला चितपट केलं. याच्या रागातून त्यांना अवघ्या 13-14व्या वर्षी गाव सोडण्यास भाग पाडण्यात आलं.

पुढे ते पुण्यात एका महिलेकडे राहू लागले. त्या महिलेने त्यांना एका शाळेत घातलं. पुढे त्यांची त्यांच्या आत्याशी भेट झाल्यानंतर ते आत्याकडे राहू लागले. आत्याच्या पतीने त्यांना आर्मी बॉईजमध्ये दाखल केलं आणि तिथून त्यांचा लष्करातला प्रवास सुरु झाला.

लष्करात सुरुवातीला त्यांनी हॉकी खेळण्यास सुरुवात केली. परंतु त्यांचं टीममध्ये सिलेक्शन न झाल्याने त्यांनी बॉक्सिंगला सुरुवात केली. बॉक्सिंगमध्ये त्यांनी अनेक पदकं मिळवली. 1964 जपानमध्ये झालेल्या स्पर्धेत त्यांनी रजत पदकदेखील पटकावलं होतं.

1965ला झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धानं पेटकर यांचं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं.

या युद्धाच्या आठवणी सांगताना पेटकर म्हणाले, “1965 च्या ऑक्टोबर महिन्यात एकेदिवशी संध्याकाळी चारच्या सुमारास शिट्टी वाजली. ती शिट्टी युद्ध सुरु झाल्याची होती. परंतु तेथील

जवानांना ती चहाची शिट्टी आहे, असं वाटलं आणि सगळे चहा पिण्यासाठी बाहेर आले तर वरुन विमानातून मोठ्याप्रमाणावर गोळीबार झाला. आम्ही लगेच पोझिशन घेऊन युद्धाला सज्ज झालो.”

“एका डोंगरावर पोझिशनला असताना माझ्या डोक्यात आणि पाठीत गोळी लागली. त्यात मला गोळी लागल्याने मी खाली पडलो त्यातच आर्मीची एक गाडी माझ्या पाठीवरुन गेली आणि मी बेशुद्ध झालो.”

त्यानंतर तब्बल दोन वर्षं पेटकर कोमात होते. पुढे त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईतल्या आश्विनी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं गेलं. तिथं त्यांना डॉक्टरांनी त्यांच्या पायांची हालचाल होण्यासाठी स्विमिंग करण्याचा सल्ला दिला आणि तिथूनच त्यांचा पॅरालिंपिकच्या गोल्ड मेडलपर्यंतचा प्रवास सुरु झाला.

याबद्दल बोलताना पेटकर सांगतात, “उपचारानिमित्त स्विमिंग सुरु केलं. पण पुढे जाऊन मी त्यात तरबेज झालो. माझ्या नशिबाने मला सर्विसेस टीम सोबत प्रॅक्टिस करता आली, त्यामुळे मला चांगली प्रॅक्टिस मिळाली. पुढे विजय मर्चंट यांनी माझी निवड आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी केली.”

त्यानंतर ते 1972 ला जर्मनीमध्ये झालेल्या पॅरालिंपिकमध्ये सहभागी झाले.

पॅरालिंपिकमध्ये स्विमिंगमध्ये त्यांना गोल्ड मेडल मिळालं तेव्हा भारताचा ध्वज वर जाताना पाहून सर्वोच्च आनंद झाल्याचं पेटकर आवर्जून सांगतात. पेटकरांना पॅरालिंपिकमधील गोल्ड मेडल बरोबरच अनेक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत.

लष्करात भरती होऊ इच्छिणाऱ्या अनेकांना पेटकर सध्या मार्गदर्शन करत आहेत तसंच आर्थिक मदत देखील करत आहेत. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन तरुणांनी देखील देशासाठी गोल्ड मेडल आणावं अशी इच्छा देखील ते व्यक्त करतात.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *