पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांना ” पिंपरी चिंचवड सन्मान – जीवन गौरव पुरस्कार ” जाहीर

भोसरी, पिंपरी, चिंचवड, आकुर्डी आणि निगडी या पाच गावांचा समावेश असणारी पिंपरी चिंचवड नगरपालिका दिवंगत खासदार आण्णासाहेब मगर यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आली. मागील ५० वर्षात गाव खेडे ते औद्योगिक नगरी, कामगार नगरी हा नावलौकिक अभिमानाने मिरविणा-या या शहराचे नाव आता जागतिक पातळीवर स्मार्ट सिटी, मेट्रो सिटी, स्पोर्टस्‌ सिटी म्हणून पुढे येत आहे. पिंपरी चिंचवड शहराच्या विकासात येथील भुमिपूत्रांसह उद्योग, व्यवसायानिमित्त देशभरातील विविध जिल्ह्यातून आलेल्या कामगारांचे व विविध क्षेत्रात कार्यरत असणा-या नागरीकांचे उल्लेखनीय योगदान आहे. त्यातील निवडक मान्यवरांचा योग्य सन्मान ‘न्यूज १४ मिडीया नेटवर्क’च्या वतीने गुरुवारी (दि. ७ एप्रिल) सायंकाळी ५ वाजता ऑटो क्लस्टर हॉल चिंचवड येथे करण्यात येणार आहे.

यावेळी पॅरालिम्पिक जलतरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांना ” पिंपरी चिंचवड सन्मान – जीवन गौरव पुरस्कार” देऊन गौरविण्यात येणार आहे. त्याचबरोबर ” पिंपरी चिंचवड सन्मान” ‘सन्मान कार्याचा – गौरव शहराचा’ हे पुरस्कार डॉ. पं. नंदकिशोर कपोते (नृत्य कला क्षेत्र), राजन लाखे (साहित्य क्षेत्र), डॉ. संजीवकुमार पाटील (नाट्य कला क्षेत्र ), राजेंद्र शिंदे (चित्रपट क्षेत्र ), डॉ. नरेंद्र वैद्य (वैद्यकीय क्षेत्र ), धनंजय वर्णेकर (शैक्षणिक क्षेत्र ), मानव कांबळे (सामाजिक क्षेत्र ), संतोष बारणे (सामाजिक तथा बांधकाम व्यावसायिक क्षेत्र ), अनिल सौंदडे (औदयोगिक क्षेत्र ), दिलीप सोनिगरा (सुवर्णपेढी व्यावसायिक क्षेत्र ), अनिता गोसावी (कर्तृत्ववान महिला) यांना प्रदान करण्यात येणार आहेत.

पद्मश्री गिरीश प्रभूणे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड चे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील आणि पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश आदी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती कार्यक्रमाचे आयोजक अविनाश कांबीकर यांनी प्रसिद्धीस दिली आहे.

यावेळी आगळी वेगळी प्रेम कहाणी असलेल्या “लगन” या मराठी चित्रपटाचे पोस्टर अनावरण करण्यात येणार असून यावेळी ‘लगन’ या मराठी चित्रपटातील कलाकारांची टीम हजर राहणार आहे.