1st Paralympic Gold Medalist Swimmer Murlikant Petkar :
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ नंतर आता पॅरालिम्पिक स्पर्धा होणार आहेत. पॅरालिम्पिक स्पर्धा २८ ऑगस्टपासून सुरू होणार आहेत. ही स्पर्धा ८ सप्टेंबरपर्यंत चालणार आहेत. यापूर्वी टोकियो येथे झालेल्या पॅरालिम्पिकमध्ये भारताने ५ सुवर्ण, ८ रौप्य आणि ६ कांस्य अशी एकूण १९ पदके जिंकली होती. पण तुम्हाला माहित आहे का पॅरालिम्पिकमध्ये भारताला पहिले सुवर्णपदक कोणी जिंकून दिले होते? चला तर मग त्या खेळाडूबद्दल जाणून घेऊया.
मुरलीकांत पेटकर यांनी पॅरालिम्पिकमध्ये भारतासाठी पहिले सुवर्णपदक जिंकले होते. हेडलबर्ग येथे १९७२ च्या पॅरालिम्पिकमध्ये, मुरलीकांत पेटकर यांनी पुरुषांच्या ५० मीटर फ्रीस्टाइल जलतरण स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. मुरलीकांत पेटकर हे भारतीय लष्करात शिपाई होते आणि पोहण्याच्या आधी ते बॉक्सर होते. १९६५ च्या भारत-पाक युद्धात देशाचे रक्षण करताना मुरलीकांत पेटकर यांना अनेक गोळ्या लागल्या, त्यामुळे त्यांना अर्धांगवायू झाला. आश्चर्यकारक बाब म्हणजे त्यांच्या पाठीच्या कण्यालाही गोळी लागली होती, जी आजतागायत काढलेली नाही.
कोण आहेत चंदू चॅम्पियन उर्फ मुरलीकांत पेटकर?
मुरलीकांत पेटकर यांचा जन्म महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील पेठ इस्लामपूर गावात १ नोव्हेंबर १९४४ रोजी झाला. त्यांना लहानपणापासूनच खेळाची आवड होती. ते अनेकदा खेळाच्या मैदानात दिसून यायचे. मुरलीकांत पेटकर जेव्हा १२ वर्षांचे झाले तेव्हा त्यांच्या आयुष्यात मोठा बदल झाला. खरे तर वयाच्या १२ व्या वर्षी मुरलीकांत पेटकर आणि गावच्या सरपंचाच्या मुलाचा कुस्तीचा सामना झाला होता. या सामन्यात पेटकर यांनी सरपंचाच्या मुलाचा पराभव केला. विजयानंतर सर्वजण टाळ्या वाजवतील असे त्यांना वाटले, पण तसे काही झाले नाही. नेमके उलटे झाले, कुस्तीचा सामना जिंकल्यानंतर त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला जीवे मारण्याच्या धमक्या मिळू लागल्या.
गावातून पळून जाऊन सैन्यात झाले भरती –
मुरलीकांत पेटकर यांच्या आयुष्यात आणखी एक वळण आले. कुस्तीत जिंकलेले पैसे त्याने स्वतःकडे ठेवले आणि गाव सोडून पळून गेले. घर-गावातून सोडून गेल्यावर मुरलीकांत सैन्यात दाखल झाले. सैन्यात असताना त्यांनी आपल्या कौशल्यावर आणखी काम केले. तिथे राहून मुरलीकांत बॉक्सिंग शिकले. एवढेच नाही तर लष्करात असताना बॉक्सिंगमध्ये पदक जिंकण्याची संधी मिळाली. १९६४ मध्ये टोकियो येथे आंतरराष्ट्रीय क्रीडा संमेलन आयोजित करण्यात आले होते. ज्यात त्यांनी बॉक्सर म्हणून पदक मिळवले.
डॉक्टरांच्या सल्ल्याने पोहायला सुरुवात केली, मग सुवर्णपदक जिंकले –
१९६५ च्या पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात मुरलीकांत पेटकर यांना ९ गोळ्या लागल्या होत्या. ते इतके गंभीर जखमी झाले की ते कोमात गेले. त्यांना एक हातही गमवावा लागला. युद्धात गंभीर जखमी झाल्यानंतर मुरलीकांत पेटकर १८ महिने कोमात राहिले. त्यानंतर त्यांना कळले की त्यांच्या शरीराच्या खालच्या भागाला अर्धांगवायू झाला आहे. यानंतर डॉक्टरांनी त्यांना पोहण्याचा सल्ला दिला. १९७२ मध्ये जर्मनीमध्ये झालेल्या पॅरालिम्पिकमध्ये त्यांनी देशासाठी सुवर्णपदक जिंकले होते. ते भारतासाठी सुवर्णपदक जिंकणारे पहिले खेळाडू आहेत. त्यांनी ५० मीटर फ्री स्टाईल जलतरणात ३७.३३ सेकंद वेळेसह आपल्या नावाची इतिहासात नोंद केली आहे. २०१८ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
मुरलीकांत पेटकर यांच्यावर ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपट बनवला होता –
विशेष म्हणजे पॅरालिम्पिकमध्ये भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या मुरलीकांत पेटकर यांच्यावर ‘चंदू चॅम्पियन’ हा चित्रपट बनवण्यात आला होता. या चित्रपटात कार्तिक आर्यनने मुरलीकांत पेटकर यांची भूमिका साकारली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खान यांनी केले होते.