First Paralympic Gold Medalist: पॅराऑलिम्पिकमध्ये मराठी माणसानं भारताला जिंकून दिलं होतं पहिलं सुवर्णपदक; बॉलिवूडने चित्रपट केलेल्या खेळाडूचं नाव माहितीये का?

First Paralympic Gold Medalist:

 

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी बहारदार कामगिरी करत एकूण (४ सप्टेंबरपर्यंत) २४ पदकं जिंकली आहेत. ज्यात ५ सुवर्ण, ९ रौप्य आणि १० कास्य पदकांचा समावेश आहे. ऑलिम्पिकमध्ये भारत पदकतालिकेत १३ व्या क्रमांकावर आहे. तसंच महाराष्ट्राच्या सचिन खिलारीने पुरुषांच्या गोळाफेक F46 प्रकारात रौप्य पदक जिंकले आहे. या रौप्य पदकासह, ४० वर्षांत पॅरालिम्पिकमध्ये गोळाफेक प्रकारात पदक जिंकणारा सचिन खिलारी हा पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला आहे. यंदाच्या स्पर्धेत तिरंदाजी स्पर्धेतही भारताने पहिले सुवर्णपदक जिंकले. ऑलिम्पिकच्या इतिहासात कुस्तीपटू खाशाबा जाधव यांनी भारतासाठी पहिले वैयक्तिक पदक जिंकून दिलं होतं. त्याचप्रकारे पॅराऑलिम्पिकमध्येही एका मराठी माणसानं भारताला पहिलं सुवर्णपदक जिंकून दिलं होतं. त्यांचं नाव आहे मुरलीकांत पेटकर.

भारतीय लष्कारात शिपाई म्हणून काम करणाऱ्या मुरलीकांत पेटकर यांनी हेडलबर्ग (जर्मनी) येथे १९७२ साली झालेल्या पॅराऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या ५० मीटर फ्रीस्टाइल जलतरण स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं होतं. अवघ्या महाराष्ट्राला अभिमान वाटावा अशी ही कामगिरी होती. मात्र काळाच्या पडद्याआड त्यांचं नाव लुप्त झालं. त्यानंतर त्यांच्या कामगिरीची दखल भारताने २०१८ साली घेतली आणि त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं.

कोण आहेत मुरलीकांत पेटकर?

मुरलीकांत पेटकर यांचा जन्म महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील पेठ इस्लामपूर गावात १ नोव्हेंबर १९४४ रोजी झाला. त्यांना लहानपणापासूनच खेळाची आवड होती. खाशाबा जाधव यांच्याप्रमाणे आपणही ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकावं, हे स्वप्न उराशी बाळगून त्यांनी लहानपणापासूनच कुस्तीच्या आखाड्यात पाय रोवले. मात्र वयाच्या १२ व्या वर्षी गावातील एका वादामुळे त्यांना गाव सोडावं लागलं. गावातून बाहेर पडल्यानंतर ते सैन्य दलात भरती झाले. सैन्यात राहून पदक जिंकण्याचं स्वप्न जोपासण्यासाठी त्यांनी बॉक्सिंगची निवड केली. १९६४ मध्ये टोक्यो येथील आंतरराष्ट्रीय क्रीडा संमेलनात त्यांनी रौप्य पदकाची कमाई केली.

दुर्दैवाने १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धात त्यांना नऊ गोळ्या लागल्या. या अपघाताने मुरलीकांत यांच्या आयुष्याला वेगळं वळण लागलं. बाकीच्या गोळ्या शरीरातून काढल्या पण एक गोळी मणक्यात अडकून बसल्यामुळे शरीराच्या खालच्या भागाला अर्धांगवायू झाला आहे. त्यांना नाईलाजाने बॉक्सिंग सोडावी लागली. पण अतिशय चिवट स्वभाव असलेल्या पेटकर यांनी जलतरणपटू होण्याचा निर्णय घेतला. पोहण्याच्या स्पर्धेत भारतातील ५० मीटर स्पर्धेत वेळेचे विक्रम मोडत त्यांनी पॅराऑलिम्पिकमध्ये भारताचा जलतरणपटू म्हणून प्रवेश मिळविला.

१९७२ साली पश्चिम जर्मनीच्या हेडलबर्ग येथे झालेल्या पॅराऑलिम्पिकमध्ये त्यांनी ५० मीटर फ्री स्टाईल जलतरण स्पर्धा ३७.३३ सेकंदात पूर्ण करून एक नवा विक्रम प्रस्थापित करत सुवर्णपदकाची कमाई केली.

पेटकर यांच्या आयुष्यावर ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटाची निर्मिती

पॅरालिम्पिकमध्ये भारताला पहिल सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या मुरलीकांत पेटकर यांच्या आयुष्यावर ‘चंदू चॅम्पियन’ हा चित्रपट बनवण्यात आला आहे. बॉलिवूडचा अभिनेता कार्तिक आर्यनने मुरलीकांत पेटकर यांची भूमिका साकारली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खान यांनी केले आहे. हा चित्रपट सध्या प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. मुरलीकांत पेटकर यांच्या प्रेरणादायी आयुष्याची कहाणी चित्रपटात अतिशय उत्कृष्ट पद्धतीने साकारण्यात आली असून मिल्खा सिंग, एमएस धोनी यांच्या सारख्या क्रीडा चरित्रपटांच्या रांगेत ‘चंदू चॅम्पियन’चाही उल्लेख केला जातो.

सुशांत सिंह राजपूत साकारणार होता भूमिका

कार्तिक आर्यनच्या आधी अभिनेता सुशांत सिंह राजपूत हा मुरलीकांत पेटकर यांची भूमिका साकारणार होता. मात्र २०२० साली सुशांतचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे त्याच्या जागी कार्तिक आर्यनची निवड झाली. जून २०२४ रोजी चंदू चॅम्पियन चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मुरलीकांत पेटकर यांनी सुशांत सिंह राजपूतला श्रद्धांजली व्यक्त केली होती.

पॅरिस पॅराऑलिम्पिकमध्ये भारताच्या खात्यात २४ पदकं

Paris Paralympic 2024 मध्ये भारताने आतापर्यंत एकूण २४ पदकं जिंकली आहेत, ज्यात ५ सुवर्ण, ९ रौप्य आणि १० कांस्य पदकांचा समावेश आहे. भारताने टोकियो पॅरालिम्पिकचा सुवर्णपदकाच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. भारताने टोकियोमध्येही पाच सुवर्णपदकं जिंकली. सध्याच्या पॅरालिम्पिकमध्ये भारत पदकतालिकेत १३ व्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत अवनी लेखरा (नेमबाजी), नितेश कुमार (बॅडमिंटन), सुमित अंतिल (भालाफेक), हरविंदर सिंग (तिरंदाजी) आणि धर्मबीर (क्लब थ्रो) यांनी भारतासाठी सुवर्णपदके जिंकली आहेत.