युद्धात ९ गोळ्या लागूनसुद्धा हार न मानता जग जिंकणाऱ्या मराठी माणसाची गोष्ट

१ नोव्हेंबर १९४७ रोजी सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरजवळील पेठ या गावात एका गरीब शेतकरी कुटुंबात मुरलीचा जन्म झाला. लहानपणापासूनच मुरलीला कुस्तीचा शौक होता. पण गरिबीमुळे कुस्तीचा शौक पुढे पूर्ण करता आला नाही. पण याच कुस्तीच्या जोरावर मिळविलेल्या शरीरयष्टीमुळे तो वयाच्या १७ व्या वर्षीच सैन्यात भरती झाला.

भरती झाल्यावर लगेचच खेळातील प्राविण्य पाहून १९६४ साली जपानमधील टोकियोत झालेल्या बॉक्सिंग स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मुरलीला मिळाली. सैन्यात राहून खेळात नावलौकिक मिळवण्याची त्याला खूप मोठी संधी उपलब्ध झाली होती. पण त्यातच १९६५ साली भारत-पाक युद्ध सुरू झाले. या युद्धात मुरलीचा प्रत्यक्ष सहभाग होता. काश्मीरमध्ये तैनात असताना पाकिस्तानी हवाई दलाच्या हल्ल्यात मुरली गंभीर जखमी झाला. एका डोंगरावर पोझिशनला असताना डोक्यात आणि पाठीत गोळी लागली. देशासाठी लढताना त्याने आपल्या शरीरावर अशा ९ गोळ्या झेलल्या. बेशुद्धावस्थेत रस्त्यावर त्यानंतर एका ट्रकने त्याचा पाय चिरडला. मुरलीवर लष्करी रुग्णालयात उपचार सुरू झाले. त्याचा जीवन मरणाचा संघर्ष सुरू झाला. कोमात असताना दोन वर्षाच्या संघर्षानंतर त्याला शुद्ध आली. परंतु कमरेखालचे शरीर लुळे पडल्याने पुढील आयुष्य त्याला चाकच्या खुर्चीवरच बसून काढावे लागणार होते.

प्रसंग बाका होता. जीव वाचला होता, पण कमरेखाली जीवच नव्हता. याही परिस्थितीत खिलाडूवृत्तीच्या मुरलीने हा मोठा आघात पचवलाच. परिस्थितीवर मात करून व्हीलचेअरवर बसून फिरू लागला. व्यायाम करू लागला. पायातील गेलेला जीव त्याने परत आणला आणि स्वतःला अपंगांसाठीच्या क्रीडा स्पर्धांसाठी तयारी करू लागला. वेटलिफ्टिंग, गोळाफेक, भालाफेक, नेमबाजी आदी विविध स्पर्धांत सहभागी होऊन यश मिळवू लागला. हाँगकाँग, ब्रिटन, कॅनडा, जपान, अमेरिका आदी विविध देशांतील अपंगांसाठीच्या क्रीडा स्पर्धांत त्याने भाग घेतला आणि पदकांची अक्षरशः लयलूट केली. १९६९ साली अपंगाच्या जलतरण स्पर्धेत अव्वल क्रमांक मिळविल्याने इंग्लंडच्या राणीकडून त्याचा सन्मान झाला. १९७२ साली जर्मनीतील हायडेलबर्ग येथे झालेल्या पॅरालिंपिक स्पर्धेत मुरलीने भारताला पहिलं सुवर्णपदक, तेही विश्वविक्रमासहित पटकावून दिलं. अशी कामगिरी करणारा मुरली म्हणजेच मुरलीकांत_पेटकर होय.

आत्तापर्यंत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये १२७ सुवर्णपदकं, तर १५४ रौप्यपदकं त्यांनी पटकावली आहेत.

पूर्ण लेख naviarthkranti.org वर

Read Post On Instagram