महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या लढवय्या हिरोच्या संघर्षाची प्रेरणादायी स्टोरी बॉलिवूडच्या पडद्यावर झळकली अन् जगाला या महान खेळाडूच्या अस्तित्वाची खऱ्या अर्थानं जाणीव झाली. पदकांचा राजा अशी ओळख असलेल्या मराठमोळ्या मुरलीकांत पेटकर यांना २०२४ च्या अर्जुन पुरस्काराने (जीवन गौरव) सन्मानित करण्यात आले.
देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांनी अर्जुन पुरस्कार स्वीकारला.
…अन् दुर्लक्षित झालेला सुवर्णपदक विजेता प्रकाश झोतात आला
सांगली जिल्ह्यातील इस्लापूर या भागातून जगाच्या पाठीवर छाप सोडणाऱ्या खेळाडूनं आयुष्यातील कठोर अडथळ्यांची शर्यत पार करत पॅरा स्विमिंगमध्ये भारताला पहिलं सुवर्ण पदक मिळवून दिले होते. बॉलिवूडमध्ये ‘चंदू चॅम्पियन’ या चित्रपटातून या पॅरा इवेंटमधील अद्वितीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूच्या संघर्ष अन् जिद्दीची कहाणी लोकांसमोर आली. या चित्रपटामुळेच दुर्लक्षित राहिलेला पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता प्रकाश झोतात आला.
‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटामुळे सन्मान लाभला
अर्जुन पुरस्कार स्वीकारण्याआधी या महान मराठमोळ्या खेळाडूनं ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटाचे निर्माते साजिद नाडियाडवाला याचे आभार मानल्याचे पाहायला मिळाले. आमच्यासारख्या अपंगाला एवढा मान कुणी कधी दिला नाही. साजिद नाडियाडवाला यांच्यामुळे मला जगात एक वेगळी ओळख अन् लोकप्रियता मिळाली. जो मान मिळतोय तो चित्रपटामुळेच, असे मुरलीकांत पेटकर यांनी म्हटले आहे.
जीवन गौरवर अर्जुन पुरस्काराबद्दल काय म्हणाले मुरलीकांत पेटकर
मुरलीकांत पेटकर म्हणाले की, मी साजिद नाडियाडवाला यांचे मनापासून आभार मानतो. कारण या माणसानं माझ्या कथेवर विश्वास ठेवला अन् ‘चंदू चॅम्पियन’च्या माध्यमातून माझं आयुष्याचा प्रवास मोठ्या पडद्यावरुन लोकांसमोर आणला. याशिवाय या महान अन् खेळाडूनं दिग्दर्शक कबीर खान आणि या चित्रपटात त्यांची भूमिका साकारणाऱ्या कार्तिक आर्यनचेही आभार मानले आहेत.
कोण आहेत मुरलीकांत पेटकर?
मुरलीकांत पेटकर हे लष्करात कार्यरत होते. १९६५ मध्ये भारत-पाक यांच्यात झालेल्या युद्धात त्यांना नऊ गोळ्या लागल्या होत्या. कंबरेच्या खालचा भागाला अर्धांगवायू झाल्यानंतर या लढवय्यानं जिद्दीच्या जोरावर पॅरा गेम्समध्ये भारतासाठी ऐतिहासिक कामगिरी करून दाखवली. १९७२ मध्ये झालेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत स्विमिंगमध्ये त्यांनी सुवर्ण पदक पटकावले होते.