भारत-पाकिस्तान युद्धामध्ये जायबंदी झाल्यानंतर सुरू झाली ती जगण्याची लढाई. पण, अंगी असलेल्या खिलाडूवृत्तीमुळे अपंगांच्या विविध क्रीडा स्पर्धांमध्ये केवळ सहभागच नाही तर थेट ऑलिम्पिक पदकांच्या विजेतेपदाने ‘जखमा अशा सुगंधी’ जाहल्या याची प्रचिती शनिवारी पुणेकरांना आली. मुरलीकांत पेटकर यांच्याशी झालेल्या संवादातून ‘अनंत अमुचि ध्येयासक्ती अनंत अन आशा’ या कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या काव्यपंक्तीचा प्रत्यय सर्वांना आला.
हिंदू महिला सभेच्या वतीने ज्येष्ठ क्रीडासंघटक डॉ. अरुण दातार यांच्या हस्ते पॅरा-ऑलिम्पिक स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते मुरलीकांत पेटकर यांना साहस पुरस्कार आणि स्वामीनिवास वृद्धाश्रमाच्या संस्थापका गौरी धुमाळ यांना लीलावती फळणीकर स्मृती सजग पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यानिमित्ताने सुमेधा चिथडे यांनी साधलेल्या संवादातून पेटकर यांचा खडतर जीवनप्रवास उलगडला. हिंदू महिला सभेच्या अध्यक्षा सुप्रिया दामले या वेळी उपस्थित होत्या.

