पुणे : अभिनेता कार्तिक आर्यन याचा ‘चंदू चॅम्पियन’ हा चित्रपट गेल्या महिन्यात देशभरात प्रदर्शित झाला. तो एका अशा शूरवीराच्या जीवनावर आधारित आहे, ज्यांनी सैन्यात असताना 1965च्या युद्धात शत्रूच्या 9 गोळ्या अंगावर झेलल्या होत्या. मात्र त्यांचा प्रवास इथं थांबला नाही, तर ते मोठ्या हिंमतीनं पुन्हा उभे राहिले, त्यांनी पुढं पॅरालम्पिकमध्ये भाग घेऊन भारताला पहिलंवहिलं सुवर्णपदक मिळवून दिलं. तसंच त्यांच्या नावावर आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरील एकूण 450पेक्षा जास्त पदकं आहेत. त्यांच्या या कार्यासाठी त्यांना भारत सरकारनं पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित केलंय. मुरलीकांत पेटकर यांचा हा प्रेरणादायी प्रवास.
मुरलीकांत पेटकर हे मूळ सांगलीचे रहिवासी. भारतीय सैन्यदलात सहभागी झाल्यानंतर जेव्हा काश्मीमध्ये त्यांनी 9 गोळ्या झेलल्या त्यातूनच त्यांना अपंगत्त्व आलं. त्यानंतर डॉक्टरांनी उपचाराचा भाग म्हणून त्यांना पोहण्याचा सल्ला दिला. हा उपचार त्यांना पॅरालम्पिकपर्यंत पोहोचवेल असा त्यांनी विचारही केला नव्हता. मात्र पोहण्यात त्यांनी स्वतःला झोकून दिलं. जलतरणपटूंसोबत पोहण्याचा सराव केला. त्याचा त्यांना फायदा झाला.
आपण पोहण्याच्या स्पर्धेत चांगली कामगिरी करू शकतो असा आत्मविश्वास आल्यावर मुरलीकांत यांनी 1968 साली पॅरालम्पिक स्पर्धेत भाग घेतला. मात्र त्यावेळी त्यांना अपेक्षित कामगिरी करता आली नाही. मग त्यांनी कसून सराव केला आणि पुन्हा ते 1972 साली जर्मनीत झालेल्या पॅरालम्पिक स्पर्धेत सहभागी झाले. यावेळी त्यांनी थेट सुवर्णपदकाला गवसणी घातली. महाराष्ट्र सरकारनं त्यांच्या कामगिरीची दखल घेऊन शिवछत्रपती पुरस्कार आणि भारत सरकारनं पद्मश्री पुरस्कारानं त्यांचा गौरव केला.
1968 नंतर थाळीफेक, गोळाफेक, टेबल टेनिस, भालाफेक, कॅरम असे 11 खेळ ते खेळत होते. 1982पर्यंत या खेळांमध्ये त्यांनी अनेक सुवर्णपदकं पटकावली. त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासावर आधारित ‘चंदू चॅम्पियन’ हा चित्रपट नक्कीच अनेकजणांसाठी आदर्श ठरेल, त्यांनासुद्धा आपल्या जीवनात खचून न जाण्याची आणि यशस्वी होण्याची भावना जागृत करेल.