इतिहासात लुप्त झालेली धैर्यकथा

चरित्रपटांच्या लाटेत अनेकदा सामान्यांमधून उभ्या राहिलेल्या असामान्य कर्तृत्वाच्या कथा नवल करायला लावणाऱ्या असतात. त्यातही बहुश्रुत, बहुचर्चित व्यक्तित्वांच्या कथांपेक्षाही आपल्याला माहिती नसलेल्या, इतिहासात लुप्त झालेल्या, पण प्रचंड प्रेरणादायी संघर्षातून इतिहास निर्माण केलेल्यांच्या कथा पडद्यावर अनुभवायला मिळणं ही कायम पर्वणी असते. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘चंदू चॅम्पियन’ या चित्रपटाच्या बाबतीत आजही सर्वसामान्यांसारखंच जगणाऱ्या अचाट कर्तृत्वाची कथा कबीर खानसारख्या ताकदीच्या आणि संवेदनशील दिग्दर्शकाच्या दृष्टिकोनातून पडद्यावर उतरलेली पाहायला मिळणं हा योग जुळून आला आहे.

‘चंदू चॅम्पियन’ पाहताना काही प्रमाणात राकेश ओमप्रकाश मेहरांच्या ‘भाग मिल्खा भाग’ची आठवण आल्याशिवाय राहात नाही. दोन्ही चित्रपट मांडणी आणि कथेच्या अनुषंगानेही फार वेगळे आहेत. तरीही चित्रपट पाहताना काहीएक साधर्म्य जाणवल्याशिवाय राहात नाही. मूळ कथा अतिशय नाट्यमय मांडणी न करता वास्तवदर्शी शैली जपत, पण त्यातलं मनोरंजनाचं मूल्य कमी होणार नाही याची काळजी घेत केलेली व्यावसायिक मांडणी हे दिग्दर्शक कबीर खान यांचं वैशिष्ट्य राहिलं आहे. ‘बजरंगी भाईजान’ हे त्यांच्या अशा शैलीतील चित्रपटांमधलं सर्वात यशस्वी आणि उत्कृष्ट उदाहरण म्हणता येईल. ‘चंदू चॅम्पियन’ची मांडणी करतानाही दिग्दर्शक कबीर खान यांनी चित्रपट मनोरंजनात कुठेही कमी पडणार नाही याची पुरेपूर काळजी घेत प्रामाणिकपणे हाताळणी केली आहे. सांगली जिल्ह्यात इस्लामपूरमधील गावात जन्मलेल्या मुरलीकांत पेटकर या कमाल जिद्दी व्यक्तिमत्त्वाची कथा चित्रपटात पाहायला मिळते.

ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून गावी परतलेल्या खाशाबा जाधव यांच्या भव्यदिव्य सत्काराचा प्रसंग छोट्याशा मुरलीकांतच्या मनावर कोरला गेला. घरची बेताची आर्थिक परिस्थिती आणि शिक्षणात फारसा रस नसलेल्या मुरलीकांतने आपणही खेळात सुवर्णपदक जिंकायचं ही गाठ मनाशी बांधून कुस्तीचं प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली. कुस्तीत पारंगत झालेला हा तरुण कुठल्याशा प्रसंगामुळे सैन्यात दाखल झाला आणि थेट बॉक्सिंगचं प्रशिक्षण घेत ऑलिम्पिक स्पर्धेत पोहोचलाही. मात्र सुवर्णपदक जिंकण्याचं स्वप्न पूर्ण करण्याचा त्याचा प्रवास कल्पनेतही येणार नाही इतका अवघड ठरला. १९६२च्या युद्धात नऊ गोळ्या अंगावर घेऊनही जिवंत राहिलेल्या पेटकर यांना अपंगत्व आलं. कमरेखाली पांगळे झालेले मुरलीकांत पॅरालिम्पिक खेळापर्यंत कसे पोहोचले आणि त्यांनी भारताला पॅरालिम्पिकमध्ये पहिलं सुवर्णपदक मिळवून दिलं. लहानपणीपासून पाहिलेलं स्वप्न त्यांनी जिद्दीने पूर्ण केलं खरं… पण ज्या देशासाठी त्यांनी हा पराक्रम गाजवला त्या देशात मात्र त्यांची दखल कोणीच घेतली नाही. इतिहासात लुप्त झालेली ही सोनेरी पराक्रमाची गोष्ट कुठल्याशा प्रसंगाने पुन्हा प्रकाशात आली आणि १९७२ मध्ये त्यांनी गाजवलेल्या पराक्रमाची दखल २०१८ साली पद्माश्री पुरस्कार देऊन घेण्यात आली. हा खराखुरा संघर्षाचा प्रवास दिग्दर्शक कबीर खान यांनी खूप सुंदर पद्धतीने पडद्यावर रंगवला आहे.

अशा प्रकारच्या चरित्रपटांमध्ये नाट्यमयता आणणं हा एकाच वेळी धोकाही असतो आणि चित्रपटात प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्यासाठी त्याची गरजही असते. त्यातही अतिशयोक्ती न करता त्या व्यक्तित्वाला मोठं करणारा धागा नेमका पकडून तो प्रेक्षकांसमोर आणणं हे आव्हान दिग्दर्शकाने चित्रपटात चॅम्पियनची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता कार्तिक आर्यनच्या मदतीने यशस्वीपणे पेललं आहे. प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट अशा पद्धतीची ही कथाही नाही आणि मूळ व्यक्तीही नाही. त्यामुळे एकीकडे त्यांचा वैयक्तिक संघर्ष, त्यातलं नाट्य आणि त्यांच्या वाट्याला आलेल्या दुर्दैवातूनही पुन्हा उभं राहण्याची त्यांची जिद्द हा प्रेरणादायी प्रवास मांडतानाच प्रसिद्धीलोलुपांच्या गर्दीत त्यापासून दूर राहणाऱ्या पेटकरांसारख्या व्यक्तीच्या वाट्याला आलेली उपेक्षा यावरही दिग्दर्शकाने सहज जाता जाता बोट ठेवलं आहे. कुठलीही प्रेमकथा मूळ व्यक्तीच्या आयुष्यात नाही, त्यामुळे ती ओढूनताणून जोडण्याचा प्रयत्नही लेखक – दिग्दर्शकाने केलेला नाही. त्यांच्या आयुष्यातील काही मोजक्या व्यक्ती आणि प्रसंगांतून हा संघर्ष प्रभावीपणे रंगवण्यात आला आहे.

या चित्रपटाचं अर्ध्याहून अधिक श्रेय हे अभिनेता कार्तिक आर्यनकडे जातं. या भूमिकेसाठी केवळ शारीरिक बदलांवर त्याने लक्ष केंद्रित केलेलं नाही. तर अतिशय अतिसामान्य दिसणाऱ्या, चंदू चॅम्पियन म्हणून हिणवल्या जाणाऱ्या पण कमालीचा आत्मविश्वास आणि बेधडक आयुष्याला भिडण्याचा स्वभाव असलेल्या मुरलीकांत यांची नेमकी नस ओळखून ती अभिनयातून साकारण्याचा त्याने पुरेपूर प्रयत्न केला आहे. त्यासाठी त्याने स्वीकारलेली देहबोली, संवादफेकीची शैली आणि शेवटपर्यंत ते सगळं टिकवून ठेवण्यासाठी केलेली मेहनत यातून हा चंदू चॅम्पियन मनात ठसतो. चंदूच्या प्रशिक्षकाच्या भूमिकेत विनोदी अभिनेते विजय राज यांची केलेली निवडही अचूक ठरली आहे. चंदूचा मित्र गर्नेल सिंग (भुवन अरोरा), टोपाझ (राजपाल यादव) अशा काही मोजक्या व्यक्तिरेखा आणि त्यासाठी निवडलेले उत्तम कलाकार याची जोड मिळाली आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची भूमिका महत्त्वाची आहे, मात्र असं असूनही त्या व्यक्तिरेखेला अधिक वाव मिळायला हवा होता. मात्र सोनालीसह हेमांगी कवी, श्रेयस तळपदे, पुष्कराज चिरपुटकर, आरोह वेलणकर, गणेश यादव या सगळ्या मराठी कलाकारांचा वावर निश्चितच सुखावणारा आहे. पटकथेनुसार केलेली बांधेसूद मांडणी आणि उत्तम अभिनय या जोरावर कबीर खान यांनी त्यांच्या शैलीत उलगडलेली इतिहासात लुप्त झालेली चंदू चॅम्पियनची धैर्यकथा नक्कीच अनुभवावी अशी आहे.